मुंबई – राज्यात कालपासून बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या मुठाड, इब्राहीपूर, तांदुळवाडी, नांजा, क्षीरसागर, मासनपूर, जोमाळा, मालखेडा, सुभानपूर या भागात आज दुपारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. पाऊणतास झालेल्या पावसात काही वेळ बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सिन्नर कळवणसह काही भागात आज दुपारी पावसानं हजेरी लावली, तर सटाणा इथल्या अंतापूर परिसरात गाराही पडल्या. ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या बेमोसमी पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागातले द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.नाशिक शहरातही पावसाचा शिडकावा झाला. भंडारा जिल्ह्याच्या काही भागात आज दुपारी 4 च्या सुमाराला माध्यम स्वरूपाच्या गारांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, वाटाणा, तूर आणि इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.










