नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्ष परीक्षेत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत. राज्यातील २७० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेस विद्यार्थ्यांची ९५ टक्के इतकी उपस्थिती आहे.
परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस ८ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सुलभता याची काळजी घेत यंदाच्या वर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या कार्यपध्दतीनुसार केंद्र प्रमुखांना कळविण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर सर्वांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन व लिक्विड सॅनिटाईझारचा वापर करण्यात येत आहे. सदरील परीक्षेचे विद्यापीठात क्लोज सर्किट टिव्ही यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नऊ हजार पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर एका दिवसाचा खंड देण्यात आला असून दि. ०३ ऑक्टोबर पर्यंत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. तद्नंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात कामकाज यशस्वी करण्यासाठी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे मार्गदर्शन तसेच, विद्यापीठाचे सहायक कुलसचिव महेंद्र कोठावदे, शंकर शिंदे, शिल्पा पवार, योगिता पाटील, अनुपमा पाटील, संदिप महाजन, संदीप नंदन, सतिश केदारे यांनी परिश्रम घेत आहेत.