मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उद्योग आघाडी प्रमुख प्रदीप पेशकार व आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी सोमवारी केली .
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते. श्री . निकम म्हणाले की , सर्व्हर हॅक होण्याची घटना 21 मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली. मात्र या बाबतची तक्रार 1 एप्रिल 2021 रोजी सायबर सेलकडे नोंदविण्यात आली . एफआयआर नोंदविण्यात 10 दिवस उशीर का झाला ? एमआयडीसी या कडून हॅकर्सशी बोलणी चालू होती , असे सांगण्यात आले. या वाटाघाटीत भाग घेण्यासाठी कोणाला अधिकृतपणे सांगण्यात आले होते , याचा खुलासा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून झाला पाहिजे. भारताची ओळख जगातील आयटी महासत्ता असल्याचे मानले जाते.आमच्याकडे आयटी उद्योगातील सर्व प्रकारचे तज्ज्ञ आहेत.आज आम्ही तंत्रज्ञानामध्ये जगाला मार्गदर्शन करीत आहोत.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमआयडीसीने या तज्ज्ञांची मदत का घेतली नाही , याचाही सरकारने खुलासा करावा . या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सींचा सहभाग का नव्हता याबद्दलही राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे.
एमआयडीसी कडे प्रत्येक उद्योगाचा तपशील, व्यवसाय योजना, वित्तीय, बँक तपशील, इमारतीच्या योजना वगैरे बारीकसारीक माहिती असते. ही माहिती हॅकर्स च्या हातात लागली आहे का या शंकेने उद्योग जगतात कमालीची अस्वस्थता आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अंबालागान यांनी आपल्या निवेदनात डेटा परत मिळाल्याचे नमूद केले आहे.पण एनक्रिप्टेड डेटाचे काय? आम्ही व आमचे व्यवसाय सुरक्षित आहेत ना अशी शंका उद्योजकांच्या मनात आहे , याचे निरसन करण्यासाठी सरकारकडून अद्याप काहीच पावले टाकण्यात आलेली नाहीत , असे श्री . पेशकार यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात सिस्टम हॅक होण्याची ही दुसरी घटना आहे. अशा घटनांमुळे महाराष्ट्रात येण्यास उद्योजक तयार होणार नाहीत , असेही श्री. निकम व पेशकार यांनी निदर्शनास आणून दिले.