मुंबई ः राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस पडत असून धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वदूर पाऊस असल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी परिसरात होणाऱ्या पावसामुळे वाढत आहे. त्यामुळे आज सकाळी गोसेखूर्द धरणाचे ११ दरवाजे उघडले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. बीड जिल्ह्यातल्या सहा महसूल मंडळात रात्री जोरदार पाऊस झाला. गेवराई तालुक्यात खळेगाव इथल्या पुलावरून एक मोटार सायकल वाहून गेली. मोटार सायकलवरून जाणारे मुलगा, मुलगी आणी त्यांचे वडील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
मुलीचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत वडवणी तालुक्यात ऊर्ध्व कुंडलिका धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे उघडले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगलीतल्या चांदोलीत वारणा धरण परिसरात मागच्या वर्षांपेक्षा यंदा कमी पाऊस पडला. असं असूनही धरणातला पाणीसाठा मात्र गतवर्षीच्या तुलनेत स्थिर आहे. धरणात सध्या २२ टीएमसी पाणीसाठा असून धरण ६४ टक्के भरले आहे .