मुंबई – राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रसरकारवर टीका केली.
मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खरं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय. या देशात केंद्रसरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
दरम्यान लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, कॅटरर्स यांना दिलासा मिळेल असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.