मुंबई – अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे-पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्रामविकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची १५ दिवसांत सीबीआयने चौकशी करुन प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकदृष्या या पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदावर दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.
परमबीर सिंह यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. होती. पण, त्यावेळेस देशमुख यांनी राजीनामा दिला नव्हता. पण, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना हे पदभार स्विकारण्याच्या सुचना देण्यात आल्या.