मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पातून नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भरिव निधीची तरतूद करण्यात आली असल्याने नाशिककरांसाठी आशादायी अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्याच्या अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मध्ये मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली आहे.तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर जतन व संवर्धन व श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थ स्थळ विकास, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड विकास यासाठी भरिव निधीची तरतूद करण्यात येऊन निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिककरांसाठी महत्वपूर्ण असलेल्या पुणे नाशिक या मध्यम व अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली असल्याने नाशिकच्या विकासाला अधिकचालना मिळणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आले आहे ही विशेष बाब असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट योजना आखण्यात आलेल्या असून ३ लाख रुपयांपर्यंत पिक कर्ज घेणाऱ्या व त्याची नियमित वेळेवर परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थाना प्रत्येकी १५० कोटी रुपये निधी दिल्यामुळे या मागास जातींच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.