मुंबई – महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आज दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. कोरोनाकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आर्थिक चक्रव्यूहाला सरकार कसं भेदणार याकडे लक्ष लागले आहे.
अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोनला विधानसभेत सादर करतील. अर्थसंकल्पातील योजनांबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी (७ फेब्रुवारी) मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची महसुली तूट एक लाख ५८ हजार कोटींच्या घरात गेली असताना राज्यातील, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, मध्यमवर्गीयांसह शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी यांना दिलासा देताना कसोटी पणाला लागणार आहे.
राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का, या कडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणार्या सेसमध्ये काही प्रमाणात कपात होऊ शकते. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं २०१८ मध्ये पेट्रोल-डिझेलवर दुष्काळी कर म्हणून २ रुपये सेस आकारला होता. दुष्काळ नसला तरी दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे.
सध्या राज्यात इंधनावर व्हॅट आणि सेस आकारला जातो. पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि १०.२० रुपये प्रतिलिटर सेस आकारला जातो. डिझेलवर २१ टक्के व्हॅट आणि ३ रुपये लिटर सेस आकारला जातो. महिला दिनी अर्थसंकल्प सादर होत असल्यानं महिलांसाठी काही विशेष घोषणा असणार का याकडेही लक्ष लागलं आहे.