नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज आज दोनदा स्थगित करण्यात आले. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, राजद, आम आदमी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकीचे कामकाज स्थगित करून या विषयावर प्रथम चर्चा घेण्याची मागणी केली. पण, अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
सकाळी सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्य हौद्यामध्ये उतरले. नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. या विषयावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. सकाळी प्रथम साडे दहापर्यंत आणि नंतर साडेअकरापर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांचा गोंधळ सुरूच राहिल्याने राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी कामकाज पुन्हा दुपारी साडेबारापर्यंत स्थगित केले. राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी या विषयावर उद्या चर्चा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. पण, विरोधी सदस्यांनी आजच चर्चेची मागणी केली.