कौशल्य विद्यापीठ उभारण्याचा निर्णय
मुंबई – राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारण्याचा निर्णय , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भातलं ‘विद्यापीठ विधेयक – २०२१’ विधिमंडळ अधिवेशनात मांडलं जाणार आहे. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावं हा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. विद्यापीठानं मान्य केलेले अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था ,या राज्य सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील. विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यायलाही मान्यता देण्यात आली.
—
कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी
मुंबई – कॅरॅव्हॅन आणि कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ‘कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण’ राबवण्यासाठीही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ ,सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसंच रोजगार वाढीलाही मिळणार आहे.कॅरॅ या व्हॅन्समध्ये निवासाच्यादृष्टीनं सर्वसुविधा असतील.
—
पिंपरी मेट्रोला मंजुरी
मुंबई – पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्रमांक.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार असेल.