मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमान प्रवासाच्या परवानगीवरुन राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नाकारल्याचे राज्यपाल सचिवालयाने म्हटले आहे. त्यात आता मुख्यमंत्री कार्यालयाने यायाबतचा मोठा खुलासा केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद होताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सरकारी विमानाचा प्रवास रोखल्याची बाब आज सकाळी समोर आली. सरकारी विमानात बसले असताना परवानगी नाकारल्याचे कळाल्याने राज्यपाल कोश्यारी अखेर राजभवनाकडे परतले. त्यानंतर राज्यपाल हे खासगी विमानाने उत्तराखंडकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री असलेले भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाणार होते. याबाबत त्यांनी स्वतःच ही माहिती दिली होती. परवानगी नाकारण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने मोठा खुलासा केला आहे. “राज्यपालांच्या दौऱ्यापूर्वीच राजभवन सचिवालयाने विमान वापरण्याच्या परवानगीची खातरजमा करुन घेणे आवश्यक होते. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. यात राज्य सरकारची कुठलीही चूक नाही. राजभवनाने विमान घेऊन जाण्याबाबत राज्य सरकारला विनंती केली होती. या परवानगीबाबत काल म्हणजे बुधवारी १० फेब्रुवारी रोजीच राजभवन सचिवालयाला कळविण्यात आले होते की अद्याप मान्यता दिलेली नाही. ही मान्यता मिळाल्यावरच राज्यपाल सचिवालयाने प्रवासाचे नियोजन करायला हवे होते. राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने ही बाब घडली आहे. वस्तूतः राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या दौऱ्याबाबत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. पण तसे न झाल्याने झाल्या प्रकाबद्दल शासनाने गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निशअचित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.”
राज्यपालांची माफी मागावी