– प्रत्येक विभागांनी व अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराचे काटेकोर पालन करून दौरा यशस्वी करावा
: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
….
नाशिक – राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बुधवार ३ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी व अधिकाऱ्यांनी राजशिष्टाराचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करून राज्यपाल महोदयांचा दौरा यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगावचे अप्पर आयुक्त धनंजय निकम, सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मिना, सहायक जिल्हाधिकारी तथा कळवण प्रकल्प अधिकारी विकास मिना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, पोलिस उप आयुक्त संग्रामसिंह निशाणदार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टेकर, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांचेसह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपरिषद व देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्ट, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या भूमीपुजन कार्यक्रमास सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजता आहे. यानंतर दुपारी २.३० वाजता राज्यापाल यांचे हस्ते सुरगाणा तालुक्यातील भिंतघर (गुलाबगाव) येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथील गोशाळेस भेट देणार असून त्यानंतर नाशिककडे प्रयाण करतील.
नाशिक शहरातील सातपूर येथील नॅशनल ब्लाईंड असोसिएशनच्या संशोधन व प्रशिक्षण निवास केंद्राच्या भूमिपुजन कार्यक्रमास सायंकाळी ५ ते ६ या कार्यक्रमानंतर राज्यपाल शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब येथे मुक्काम करणार आहेत. यासर्व दौऱ्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली कामे राजशिष्टाचारानुसार विहित वेळेत पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या तिनही कार्यक्रमांचे नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने पार पाडावे, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले.
राज्यपालांना निवेदन व भेटण्यासाठी परवानगी आवश्यक
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना त्यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्या दरम्यान ज्याही व्यक्ति अथवा संघटना यांना निवेदने द्यावयाचे असतील, त्यांनी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे नावांची नोंदणी करून कायदा वसुव्यवस्थेच्या दृष्टिने पूर्व परवानगी घ्यावी, असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठकीत केले आहे.