मुंबई – राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला राजभवनाकडे जाताना रोखण्यात आले आहे. आझाद मैदानात आलेल्या या मोर्चाला पोलिसांनी मेट्रो सिनेमा चौकात अडविण्यात आले. राजभवनाकडे जाऊन आंदोलक शेतकरी राज्यपालांशी चर्चा करणार होते. मात्र, राजभवनात राज्यपाल नसल्याची बाब आंदोलक शेतकऱ्यांना कळाली. त्यामुळेच ‘राज्यपाल पळून गेले’ असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच, जोरदार घोषणाही दिल्या. राज्यपालांशी भेट झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा आंगोलकांनी घेतला. त्याचवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सचिव सावंत, भाई जगताप, अशोक ढवळे, मेधा पाटकर, चरणसिंह सप्रा या सर्वांना पोलिसांनी गाडीत बसवून घेऊन गेले.
शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, आम्हाला अडवले गेले. दुसरीकडे राज्यपाल पळून गेले. पोलिसांना आमच्या विरोधात उभे करण्यात आले. हे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही राज्यपालांना भेटल्याशिवाय जाणार नाही. राज्यपालांनीच आम्हाला वेळ दिली होती आणि आता तेच नाहीत. त्यांनी मोर्चा पाहून पळ काढल्याचे भाई जगताप म्हणाले. दरम्यान, उद्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला वंदन करुन सर्व आंदोलक शेतकरी माघारी फिरतील, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.