नाशिक : राज्यपालांच्याआडून भाजपाकडून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. भाजपाने राज्यापालांचा ढालीसारखा वापर सुरू केला आहे. त्यामुळे राज्य शासन आणि राज्यपाल यांच्यात शीत नव्हे तर उघड युध्द सुरू असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले. नाशिक दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, राजभवनाकडूनच सरकारविराेधात काही गाेष्टी घडत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांचे आणि सरकारचे शीतयुद्ध नव्हे तर उघड युद्ध सुरू आहे. राज्यपालांच्या भूमिकेमुळे जनहिताची अनेक कामे रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यपालांनी भाजपाच्या भूमिकेतून बाहेर येऊन संपूर्ण राज्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवजयंती निर्बंध
यावेळी शिवजयंतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, राज्य सरकारने घातलेले निर्बंध हे जनहितासाठी आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी यापेक्षा कडक निर्बंध घातले असते. ज्यांना रयतेची काळजी असते ते असे निर्णय घेत असतात. राज्य सरकारने काही आनंदाने शिवजयंती मिरवणुकांवर बंदी घातलेले नाही तर नागरिकांच्या आराेग्याची काळजी आहे म्हणून हे निर्बंध घातले असल्याचेे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय आंदाेलनांना तसेच मेळाव्यांना हाेत असलेली गर्दी नियमबाह्य आहे. राज्यात अजूनही काेराेनाबाबत काही नियम आहेत. ते प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात काेराेनाचे रुग्ण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्णवला अटक करा
झारीतला शुक्राचार्य काेण ? असा प्रश्न करत त्यांनी पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याबाबत अर्णव गाेस्वामीला आधीच माहिती कशी मिळाली असे सांगत झारीतला शुक्राचार्य काेण ? असा प्रश्न उपस्थितीत केला. यावेळी त्यांनी याचा शाेध घ्यायचा असेल तर अर्णवला अटक करायला हवी. ही मागणी आम्ही आधीच केली आहे. मात्र केंद्र सरकारने अजून ती मागणीही मान्य केलेली नाही असेही त्यांनी सांगितले.