नवी दिल्ली – मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने यापूर्वी ३० मार्च आणि ९ जून रोजी मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर असल्याचे सांगितले होते.
देशभरातील कोविड१९ संक्रमण परिस्थिती पाहता, वर निर्देशित केलेली कागदपत्रे ज्यांची वैधता १ फेब्रुवारी रोजी संपली आहे किंवा ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे, त्या सर्वांना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाचा नागरिकांना वाहतुकीसंबंधी सेवा घेताना लाभ होईल.