नाशिक : शैक्षणिक सत्रापासून अंधत्व, बहुविकलांगांच्या संदर्भात ज्या दृष्टीबाधितांना अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांना दृष्टीबाधितांच्या विषयात संशोधन करावयाचे असेल, युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षेकरिता अभ्यास करावयाचा असेल, वाचस्पती पदवी संदर्भात शिक्षण घ्यायचे तसेच दिव्यांगां संदर्भातील विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काही अपत्कालीन कार्यशाळा घेण्यासाठी निवासी व्यवस्था व्हावी यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, युनिट महाराष्ट्र, नाशिकच्या वतीने ‘नॅब महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण विद्यार्थी वसतीगृहाचा भूमीपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते बुधवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता ‘नॅब संकुल’ नाईस औद्योगिक परिसर, प्लॉट नं.पी-६६, ए-रोड, लेन नं.३, राठी चौक, त्र्यंबकरोड, सातपूर नाशिक येथे संपन्न होणार असल्याची माहीती नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर व नॅब महाराष्ट्र, नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अधिक माहीती देतांना कलंत्री म्हणाले की, ६० मुलींची निवासाची व्यवस्था या वास्तूमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात नॅब महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त तसेच उद्योगपती देवकिसनजी सारडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सदरील वसतीगृहासाठी ३ कोटी रुपये खर्च येणार असून यामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, विषयतज्ञ व्याख्याते, प्रशिक्षणार्थींच्या अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुर्यभान साळुंके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सौ. मंगला कलंत्री, विनोद जाजु, राजेंद्र कलाल व श्याम पाडेकर उपस्थित होते.