नाशिक – राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना सादरीकरणाचा खर्च, प्रवास व भोजन भत्ता आणि पारितोषिकांची रक्कम अद्याप शासनातर्फे देण्यात आलेली नाही. स्पर्धा संपून आठ महिने उलटले असले तर शासन याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे नाट्यसंस्थांचा हिरमोड झाला आहे. संबंधित प्रकारचा पाठपुरावा व्हावा यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा आणि बाल रंगभूमी परिषद, नाशिक यांच्यातर्फे माजी आमदार व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते हेमंत टकले यांना निवेदन देण्यात आले .
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, दिव्यांग स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धा उलटून आठ महिने झाले असले तरी शासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि बाल रंगभूमीतर्फे अखेरीस पुढाकार घेण्यात आला आहे. आठ महिने उलटून कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने अखेरीस नाट्यपरिषदेतर्फे निवेदन देण्यात आले. सादरीकरणाचा खर्च, प्रवास व भोजन भत्ता आणि पारितोषिकांची रक्कम यापैकी कोणत्याही प्रकारची रक्कम संस्थांना अद्याप मिळालेली नाही. यामुळे नाशिकमधील नाट्यसंस्था व रंगकर्मी यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. याकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावे व संबंधित खर्च आणि पारितोषिकांची रक्कम लवकर मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते टकले यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सहकार्यवाह विजय शिंगणे, स्पर्धा समन्वयक राजेश जाधव, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष सचिन शिंदे, प्रमुख कार्यवाह आनंद जाधव हे उपस्थित होते.