हनुमंत चिटणीस, ज्येष्ठ पत्रकार परभणी
….
महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचा जिवलग मित्र,एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पुणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारा राजेंद्र सरग यांचा आज पहाटे मृत्यू झाला. हे धक्कादायकच म्हणता येईल. कधी कल्पनाही केली नाही. एक चालता-बोलता प्रामाणिक पत्रकार असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. लिहिण्यापेक्षा व्यंगचित्र नेहमी त्याची गाजले तो खळखळून हसायचा आणि मनमुराद दादही द्यायचा, प्रत्येक वाक्याला!! परभणीला असताना नेहमी भेट होत असे हसतमुख आणि सहकार्य करणारा असा हा मित्र होता. अधिकारी पदाचा कधी राजेंद्र ला गर्व नव्हता.
राजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड,नगर,परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिकांना व महाराष्ट्रातील १५० ते २०० दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत असत. पत्रकारांचे जवळचे मित्र म्हणून ही त्यांची ख्याती होती.
संधी हुकली !
राजेंद्र सरग यांनी नवीन,जुना,लहान, मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही.प्रत्येकास सहकार्य केले.त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मुंबई मंत्रालयातून सांगण्यात आले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं राजेंद्रला प्रमोशन मिळालं असतं तर निश्चितच भेट झाली असती. पण आज तो निघून गेला काळाच्या पडद्याआड गेला, महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचा जवळचा मित्र कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड गेला.