येवला – तालुक्यातील राजापूर परिसरात रानडुकरांनी शेतकर्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वनविभागाने रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
रात्रीच्या वेळेस शेतकर्यांच्या उभ्या असलेल्या मका पिकात रानडूकर हैदोस घालतात. मका पीक पाडून मकाच्या बिट्या खाऊन टाकतात. रानडुकरांच्या या त्रासाला शेतकरी वर्ग वैतागले आहेत. मका सोंगणीसाठी एक ते दीड महिना बाकी असून तो पर्यंत शेतकर्यांच्या हातात काही पिक येते की नाही, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. वनविभागाने रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पंढरीनाथ आव्हाड, मंगल साहेबराव आव्हाड, विठाबाई शिवाजी वाघ, वाल्मीक सानप, सोपान आव्हाड, विजय आव्हाड सोपान वाघ, ज्ञानदेव आव्हाड, सागर वाघ, माधव वाघ, आप्पा वाघ, भानूदास वाघ, सूरेश वाघ, चंद्रभान आव्हाड आदींनी केली आहे.