मनाली देवरे, नाशिक
…..
राजस्थान रॉयल्सने शुक्रवारच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा ७ गडी राखून पराभव केला आणि अजून या आयपीएल सिझन मधील आमचे आव्हान संपलेले नाही हे सिध्द करून दाखवले. गुरूवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जे हाल कोलकाता नाईट रायडर्स संघाचे केले होते तेच हाल शुक्रवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचे करून दाखविले. फरक इतकाच की, चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले होते तर राजस्थानच्या विस्तवातील धग अदयाप बाकी आहे. या आयपीएलच्या गुणांचा फॉर्मेट फार मजेशीर आहे. इथे जो सुरूवातीपासून सामने जिंकतो तोच सहज पुढे जातो अन्यथा, “दोन–तीन मॅच हरल्याने काय फरक पडतोय, एकूण १४ सामने खेळायचे आहेत” असा समज मनात ठेवून जो संघ खेळतो त्याचे शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाब सारखे हाल होतात हे आजच्या निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले. स्पर्धा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला सलग ५ सामने जिंकणारी मुंबई इंडीयन्स आज क्वालिफाय करून शांत बसली आहे तर स्पर्धेच्या शेवटी शेवटी सलग ५ सामने जिंकणारी किंग्ज इलेव्हन पंजाब अस्तीत्वासाठी अजुनही लढते आहे.
राजस्थान संघाची तारीफ करावी तितकी कमी ठरेल. १८५ धांवाचा मोठा डोंगर पार करतांना रॉबीन उथप्पा (३०), बेन स्टोक (५०), संजु सॅमसन (४८), कर्णधार स्टीव्ह स्मिथ (३१) आणि जॉस बटलर (२२) या सर्व फलंदाजांनी आपआपला वाटा उचलला आणि कठीण परिस्थीतीत संघाला विजय मिळवून दिला.
प्ले ऑफ मध्ये पोहाचण्याचे टार्गेट गाठण्याची ओढ किंग्ज इलेव्हन पंजाब संघापेक्षा ख्रिस गेलला बहुदा जास्त असावी. तो संघात परत आल्यापासून ज्या पध्दतीने प्रत्येक सामन्यात खेळतोय त्यावरून तरी असेच वाटते आहे. शुक्रवारच्या सामन्यात देखील राजस्थान रॉयल्ससमोर ख्रिस गेल असाच खेळला. ९९ या वैयक्तीक धावसख्येंवर तो बाद झाल्यावर मैदानावर बॅट फेकून त्याने व्यक्त केलेला राग, हा क्रिकेटच्या मैदानावरील राजशिष्टाचाराच्या विरूध्द जरी असला तरी त्यात सामना जिंकण्यासाठी जो उत्साह असावा लागतो तो दिसत होता हे नक्की. ८ षटकार, ६ चौकार आणि त्याआधारे अवघ्या ६३ चेंडून ९९ धावा हा गेलचा लढवया झंझावात फार कमी खेळाडूंमध्ये बघायला मिळतो. राजस्थान विरूध्द त्याने केवळ पॉवरप्ले मध्ये गोलंदाजांचा कणा मोडला नाही तर संधी मिळेल तिथे त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. के.एल.राहूल आता या आयपीएल सिझनचा इतका यशस्वी फलंदाज म्हणून पुढे आला आहे की, आता जर तो एखादया सामन्यात यशस्वी ठरला नाही आणि लवकर बाद झाला तर प्रेक्षक पंचावर अविश्वास दाखवतील. या सामन्यात देखील राहूलची ४६ धावांची सातत्यपुर्ण फलंदाजी आणि निकोलस पुरणच्या १० चेंडूत २२ धावा. पंजाबच्या इतर खेळाडूंना धावा जमविण्यासाठी फारसे काही कष्ट पडले नाही तरी त्यांनी प्रथम फलंदाजी करतांना १८५ धावांचे एक मोठे आव्हान राजस्थान समोर विजयासाठी ठेवले होते.
शनिवार – दोन महत्वाच्या लढती
शनिवारी दोन महत्वाच्या लढती आहेत. प्ले ऑफसाठी क्वालिफाय झालेल्या मुंबई इंडियन्स चा मुकाबला दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर तर दुस–या सामन्यात रॉयल चॅलेजंर्स बंगलोर संघाचा मुकाबला सनरायझर्स हैद्राबाद संघाबरोबर होईल. मुंबईला निकालाची फारशी चिंता नसली तरी पहिल्या दोन संघात स्थान पक्के ठेवण्यासाठीच त्यांचा गेमप्लान तयार असेल. पहिल्या दोन संघात प्ले ऑफमध्ये जो क्वालिफायर क्र.१ या सामना होतो त्यातला विजेता थेट अंतिम सामन्यात जात असल्याने त्याला एलिमिनेटर सामना खेळावा लागत नाही. सहाजिकच, मुंबई प्ले ऑफ साठी क्वालिफाय झालेला संघ असल्याने हा सामना फार चुरशीचा होणार नाही असे वाटू देवू नका. दिल्लीला देखील विजयाचे हरवलेले दिवस परत आणावे लागतील. दुसरीकडे आरसीबीने सनरायझर्सला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर गफलत होवू शकते. या सर्व कारणांमुळे दोन्ही सामने चुरशीचे होतील यात शंका नाही.