मनाली देवरे, नाशिक
…..
सनरायझर्स हैद्राबाद संघाने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून दारूण पराभव केला. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफमध्ये पोहाचण्याच्या आशा आता जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. या आयपीएल सिझनमधला ४० वा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर खेळला गेला. त्यात १५४ धावांचा पाठलाग करतांना सनरायझर्स हैद्राबाद संघाने १८.१ षटकातच ८ गडी राखून हा सामना जिंकला. मनिष पांडे (८३ धावा) आणि विजय शंकर (५२ धावा) हे मधल्या फळीतले फलंदाज हैद्राबाद संघासाठी विजयाचे मानकरी ठरले, राजस्थानची कमकुवत गोंलदाजी त्यांना पराभवाचे पुन्हा एक मोठे कारण बनली. एकटया जोफ्रा आर्चर शिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला बळी घेता आले नाही.
त्याआधी प्रथम फलंदाजी करतांना राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकात १५४ धावांचे आव्हान सनरायझर्स हैद्राबाद संघासमोर ठेवले होते. फलंदाजी करतांना राजस्थानचे फलंदाज क्रमाक्रमाने ढेपाळत गेले परंतु तरीही १५४ ही माफक धावसंख्या त्यांना धावफलकावर झळकवता आली. जेसन होल्डरने संजु सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि रियान पराग या तीन महत्वपुर्ण विकेटस घेतल्या. बुधवारी झालेल्या सामन्यात रॅायल चॅलंजर्सने कोलकाता नाईट रायडर्सचा मोठया फरकाने पराभव केल्याचा फायदा राजस्थान रॉयल्सला होणार होता परंतु, त्याचा उपयोग राजस्थानला करून घेता आला नाही,
शुक्रवारची लढत
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा साखळीमध्येच गारद होण्याची नामुष्की चेन्नईला झेलायला आवडणार नाही. धोनीच्या जिगरबाज सीएसके संघाला काही “जर–तर” नावाचे फॉर्म्युले किंवा फंडे यशस्वी झाले तर अजुनही प्ले ऑफ रांउड गाठण्याची संधी आहे. परंतु त्यासाठी सीएसकेला तुल्यबळ मुंबई इंडीयन्स विरूध्द शुक्रवारच्या सामन्यात मोठया फरकाने जिंकावेच लागेल. सामना शारजात आहे. तुलनेने छोटया सिमारेषा असलेल्या मैदानावर जोरदार फटकेबाजी अपेक्षीत आहे.