मनाली देवरे, नाशिक
…..
अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ चेंडू बाकी असतांनाच किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा ४ गडी राखून पराभव केला. या मोसमातला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात रोमहर्षक ठरलेला असा सामना होता. किंग्ज इलेव्हनने दिलेले २२३ धावांचे मोठे आव्हान राजस्थान राॕयल्सला पार करता येईल की नाही ? अशी शंका वाटत असतानाच स्टीव स्मिथ ५० (२७ चेंडू), संजू सॅमसन ८५ (४२ चेंडू) आणि त्यानंतर राहुल तेवतिया ५३ (३१ चेंडू) या फलंदाजांनी हे अवघड काम पूर्ण करून दाखवले. त्यांच्या या कामात अखेरच्या क्षणी ३ चेंडूत १३ धावा करणाऱ्या जोफ्रा आर्चरने खारीचा वाटा उचलला. ज्या मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर किंग्ज इलेव्हनची पूर्ण मदार होती त्या मोहम्मद शामीने आज ३ बळी घेतले खरे, परंतु ४ षटकांत ५३ धावा देणारा शामी महागडा गोलंदाज ठरला आणि तिथेच किंग्ज इलेव्हन संघाची सामना जिंकण्याची रणनिती देखील सपशेल फोल ठरली.
किंग्ज इलेव्हनचे दमदार आव्हान
आजच्या सामन्यात राजस्थान राॕयल्सने टाॕस जिंकल्यानंतर किंग्ज इलेव्हन संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यांनी या संधीचे सोने करताना २० षटकात अवघे २ गडी गमावून विनासायास २२३ धावांचा डोंगर उभा केला होता.
मयंक अगरवालचे शतक
मयंक अगरवाल २०११ पासून आयपीएल मध्ये खेळतोय. या सामन्यात मयंकने आपला सर्व अनुभव पणाला लावून अवघ्या ५० चेंडूत १०६ धावा केल्या. तुलनेने छोट्या असलेल्या शारजाच्या मैदानावर त्याने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. मयंक एकीकडे धुवांधार फलंदाजी करीत असताना त्याचा कर्णधार के. एल. राहुल याने मात्र संयमाने दुसरी बाजू लावून धरली आणि ५४ चेंडूत ६९ धावा केल्या. या दोघांच्या कामगिरीवर विजयासाठी एक अवघड आव्हान उभे करणे किग्ज इलेव्हनला शक्य झाले होते, परंतु त्याचा उपयोग त्यांना करुन घेता आला नाही.
सोमवारचा सामना
या आठवड्याची सुरुवात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातील लढतीने होईल. दोन्ही संघांचे पारडे सध्या सारखे आहे. १ पराभव आणि १ विजय असा इतिहास घेवून हे दोन्ही संघ उद्या लढतील. या लढतीत “काटे की टक्कर” अपेक्षित आहे. दुबईत आतापर्यंत ज्या ४ लढती झालेल्या आहेत त्यापैकी किंग्ज इलेव्हनच्या एका डावाचा अपवाद सोडला तर कुणालाही दोनशे पर्यंत मजल मारता आलेली नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ किती मोठे टार्गेट उभे करतो? यावर बरेच काही अवलंबून राहील.