नवी दिल्ली – पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)च्या हस्तकाला राजस्थानातील बाडमेर येथून अटक करण्यात आली आहे. तशी माहिती राजस्थान पोलिसांनी दिली आहे. नाशिकमधूनही एकाला अटक झाल्यानंतर काही दिवसातच आता दुसरा हस्तकही जेरबंद झाला आहे. त्यामुळे आयएसआयच्या भारतातील हेरगिरीही समोर येत आहेत.
नाशिक जवळील ओझर येथे असलेल्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आयएसआयला संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. त्यास काही दिवस उलटत नाही तोच आता राजस्थान पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने आयएसआयच्या एका हस्तकाला शनिवारी अटक केली आहे. तशी माहिती राजस्थान पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालकांनी दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच आयएसआयशी निगडीत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीचा नाशिकच्या व्यक्तीशी काही संबंध आहे का, दोघांनी दिलेली माहिती एकाच व्यक्तीला आहे की वेगवेगळ्या यासह विविध प्रकारच्या बाबी तपासण्यासाठी भारतातील गुप्तहेर संघटना सक्रीय झाल्या आहेत.
दरम्यान, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)ने सप्टेंबर महिन्यात एका व्यक्तीला अटक केली होती. त्याने नौदलाशी निगडीत हेरगिरी केली होती. तो गुजरातच्या गोध्रा येथील रहिवासी आहे. त्याचीही सध्या कसून चौकशी सुरू आहे.