नाशिक – उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्या असून त्यांचे मूळ राजस्थानात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळेच पोलिसांचे पथक राजस्थानात तपासासाठी गेल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात नाशिक परिक्षेत्रामध्ये ४४ गावठी कट्टे, ७४ काडतूसे, १२१ तलवार असा सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ४६ गुन्हे दाखल करून १३० संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ तलवारी नाशिक ग्रामीणमध्ये तर २९ धुळे जिल्ह्याात जप्त करण्यात आल्या आहेत.
असे आहे तलवारींचे कनेक्शन
राजस्थानमधून तलवारी उत्तर महाराष्ट्रात विक्रीसाठी येतात. मालेगाव, धुळे येथील कारवाईत पोलिसांनी मोठ्या संख्येने तलवारी जप्त केल्या. बहुतांश तलवारींना धार नव्हती. राजस्थानमधून धार नसलेल्या तलवारी येतात. स्थानिक पातळीवर धार लावून त्यांची विक्री केली जाते. तलवारींची खरेदी गुन्हेगारांच्या टोळक्यांकडून किंवा एखाद्याा गटाकडून झालेली नाही. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन तपास केल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले आहे.