जयपूर – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राजस्थान सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. १ ते ३१ डिसेंबर दरम्यान रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत सदर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये ३१ डिसेंबर पर्यंत कडक लॉकडाउन लागू राहील. विशेष म्हणजे राज्य सरकारच्यावतीने कोरोना रूग्णांवर उपचारासाठी डे केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील काही भागात विशेषत: कोटा, जयपूर, जोधपूर, बीकानेर, उदयपूर, अजमेर, भिलवाडा, नागौर, पाली, टोंक, सीकर आणि गंगानगर येथे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाईल. विशेष म्हणजे यासाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षक (देखरेख) पथकांद्वारे घरोघरी जाऊन आजारी व कोरोना बधीत रुग्णांची सखोल चौकशी केली जाईल.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहतील. याशिवाय सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणे देखील बंद ठेवली जातील. खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबरपर्यंत सामाजिक आणि राजकीय उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्य आणि अन्य मोठ्या समारंभासाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, राजस्थान सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता कोविड केंद्रांवर डे केअर सुविधा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाला दिले आहेत. कोरोनावर उपचार करणार्या सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयात सदर डे केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. याबाबत राज्य वैद्यकीय विभागाचे सचिव सिद्धार्थ महाजन यांनी सर्व रुग्णालय व्यवस्थापकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांना डे केअर सेंटरसाठी फक्त २५०० रुपये शुल्क आकारले जाईल. तर सरकारी रूग्णालयातील ही सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. या केंद्रांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार होणार आहेत.