मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणेकरून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
लोकलही ठप्प
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असे निर्देश त्यांनी दिले.
परीक्षा पुढे ढकलल्या
राजधानी मुंबईच्या पूर्व तसेच पश्चिम उपनगरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुंबईत अनेक मोठ मोठ्या कार्यालयात, मॅाल व इतर ठिकाणी अंधार पसरला आहे. महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा / पडघा केंद्रात सर्किटच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी सर्व वीज पुरवठा पर्यायी सर्किट वरून केला जात होता. मात्र, अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे परिसरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई यासह ठाण्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने लोकलच्या वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. विजेअभावी सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. आज दुपारी १ ते २ यावेळेत मुंबई विद्यापीठाच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून याबाबत मुंबई विद्यापीठाने अधिकृत माहिती दिली आहे. पुढील तारखेचे नियोजन विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
ऊर्जामंत्री म्हणाले
कळवा – पडघे येथील महापारेषणच्या ४०० केव्हीच्या पहिल्या सर्किटच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी दुसऱ्या सर्किटवर वीजपुरवठा निर्भर करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.