मनाली देवरे, नाशिक
…
दिल्ली कॅपिटल्स संघाची घोडदौड मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद संघाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सहजपणे रोखली. हा सामना सनरायझर्सने १५ धावांनी जिंकून या सिझनमधले आपल्या विजयाचे खाते उघडले.
आज एकच प्रश्न विचारला जात होता, दिल्ली कॅपिटल्स विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार की सनरायझर्स हैदराबाद आपल्या विजयाचे खाते उघडणार ? परंतु, १६२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज आपल्या प्रयत्नात १५ धावांनी कमी पडले. आज दिल्लीची राजधानी एक्सप्रेस रोखून धरायला कारणीभूत ठरला तो मुळचा अफगाणिस्तान संघातला खेळाडू राशीद खान. राशीदच्या मनगटात जादू आहे. ही जादू ज्या दिवशी चालते त्यादिवशी फलंदाजांचे काहीच चालत नाही. ४ षटकात राशीदने अवघ्या १४ धावा दिल्या आणि त्या मोबदल्यात शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत हे दिल्लीचे सरदार टिपले. दिल्लीचा पराभवाला तोच कारणीभूत ठरला.
डेव्हिड वाॕर्नरची सुरेख फलंदाजी
त्याआधी सनरायझर्स हैदराबाद संघाने आज सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आश्चर्यकारकरित्या २० षटकात ४ बाद १६२ धावांची एक चांगली धावसंख्या रचली. जॉन बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी एक मजबूत पाया रचून दिल्यानंतर मधल्या फळीत केन विल्यमसन आणि अब्दुल समद यांनी त्यांच्या डावाला आकार दिला. दुखापती नंतर परतलेला ईशांत शर्मा हा दिल्लीचा गोलंदाज फारसा प्रभावी ठरला नाही, परंतु अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि कागिसो रबाडा यांनी मात्र,आज किफायतशीर गोलंदाजी केली.
बुधवारचा सामना
कोलकत्ता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढण्यासाठी बुधवारी दुबईतल्या मैदानात उतरतील. संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, कर्णधार स्टीव्ह स्मिथ हे राजस्थान संघातले सर्व फलंदाज फार्मात आहेत. सुनील नरेन, शिवम मावी, कमिंस आणि आंद्रे रसेल यासारख्या गोलदांजाकडून केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकला परिश्रम करुन घ्यावे लागतील.
यंदा उलटफेर अपेक्षित
आतापर्यंत झालेल्या सुरुवातीच्या काही सामन्यांवरून यंदाच्या सीझनमध्ये काही मोठा उलटफेर बघायला मिळतो की काय ? अशी चिन्ह दिसू लागली आहेत. कारणही तसेच आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, राॕयल चॕलेंजर्स, बंगलोर या तीन टीम मागच्या वर्षीच्या आयपीएल मध्ये शेवटच्या तीन क्रमांकावर होत्या. परंतु, सध्या सुरु असलेल्या सिझनमध्ये याच टीम गुणांच्या टेबलमध्ये पहिल्या चार मध्ये आहेत.