मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र पाठल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेचे तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीची अडचण वाढली आहे. त्यामुळेया राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आज रविवारी संध्याकाळी ७ वाजता होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात ही बैठक होणार आहे. परमबीर सिंह यांच्या दाव्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या काल फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोपांनंतर विरोधक काहीसे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत देखील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुणाला तरी खुश करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिले असावे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणातून सुटण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्राचा घाट घातल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझे आणि शिवसेना यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच हे पत्र आल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.