अहमदाबाद – गुजरातमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रंगत वाढली आहे. त्यामुळेच देशभरात असून, सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. पोरबंदर नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्येसुद्धा रंगत वाढली आहे. त्याला कारणही तसंच आहे, या प्रभागात एकाच व्यक्तिच्या दोन पत्नी आमनेसामने आहेत.
भाजप नेते व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केशुभाई सीडा यांच्या दोन पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उषाबेन सीडा भाजपच्या उमेदवार आहेत, तर शांताबेन सीडा काँग्रेसच्या. या दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्या नाहीत. यापूर्वीसुद्धा उषाबेन सीडा जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. तर शांताबेन सीडा पंचायत समितीच्या सदस्य राहिल्या आहेत.
केशुभाई सीडा कोणाच्या बाजूनं आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न सगळेच जण उपस्थित करत आहेत. तर केशुभाई सीडा पहिली पत्नी उषाबेन सीडा यांच्या पाठिशी उभे आहेत. काँग्रेसला या प्रभागात चांगला उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांनी माझ्या दुसऱ्या पत्नीला तिकिट दिलं आहे, असं केशुभाई सांगतात. काही दिवसांपूर्वी केशुभाई यांची दुसरी पत्नी शांताबेन यांनी त्यांच्याविरुद्ध धमकी देणे आणि घरात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.