कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अपघातानंतर निवडणुकीचे राजकारण बदलेल, असे संपूर्ण देशाला वाटले होते. मात्र अद्याप तरी त्याचा फारसा प्रभाव दिसू लागलेला नाही. उलट तृणमूल काँग्रेसचे आणखी दोन खासदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार व संस्थापक सदस्य शिशीर अधिकारी यांनी सांगितले की, ‘मला आमंत्रित केले तर कांथीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत मी भाजपमध्ये सामील होईल.’ शिशिर अधिकारी हे भाजपनेते शिवेंदू अधिकारीचे वडील आहेत.
शिवेंदू यांनी अलीकडेच तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ते ममता बॅनर्जींच्याच विरोधात उभे आहेत. शिशिर अधिकारी यांनी म्हटले आहे की, ‘मला निमंत्रण मिळाले आणि माझ्या मुलांनी मला परवानगी दिली, तर मी मोदींच्या जाहीर सभेत नक्की जाणार.’
शिशीर यांची दोन मुले शिवेंदू आणि सोमेंदू अधिकारी भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांचा आणखी एक मुलगा दिव्येंदू हा काँग्रेसचा खासदार आहे. भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी शनिवारी शिशिर अधिकारी यांच्या निवासस्थानावर गेल्या होत्या. त्यांनी एकत्र दुपारचे जेवणही केले. ही अनौपचारिक भेट असल्याचे माध्यमांना सांगण्यात आले.
मात्र शिशिर अधिकारी व त्यांचा मुलगा दिव्येंदू दोघेही भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे निवडणूक अभियान तसेच इतर उपक्रमांमध्ये ते गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णपणे लांब आहेत.