नाशिक – शहरात जवळपास सर्व रस्त्यांवर संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड, सिन्नर फाटा येथे आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या भोंगळ कारभारामुळेच रस्त्यात खड्डे असल्याचा आरोप करीत आंदोलक महिलांनी खड्ड्यांमध्ये कमळाची फुले टाकली.
भामरे यांनी सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक रोड प्रभाग क्रमांक १९ मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने आंदोलक महिलांनी महानगरपालिके विरोधात घोषणा दिल्या. खड्ड्यांमुळे विशेष करुन दुचाकीधारक महिलांना त्रास होत आहे. रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीधारक महिला अपघातग्रस्त होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रोगराईत वाढ होऊ शकते. महानगरपालिका क्षेत्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे महिलांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कमळाची फुले टाकून निषेध नोंदवला. महापौर सतिश कुलकर्णी यांनी प्राधान्याने संपूर्ण शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. स्मार्ट सिटी सर्वेक्षणात महाराष्ट्रात नाशिक शहराने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. तेव्हा नाशिक शहराचा भविष्यातही नावलौकिक कायम रहावा, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
आंदोलनात भामरे यांच्यासह नाशिक रोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, रंजना गांगुर्डे, नैना दराडे, माधुरी सावंत, अश्विनी जोशी, सपना निकम, दुर्गा कल्याणी, शमीम खान आदि महिला उपस्थित होत्या.