मुंबई – रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तींवर आता राज्य सरकारतर्फे मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल.
या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.
या योजनेत पहिल्या ७२ तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डमधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही. या योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकदेखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.