गोंधळ!
गेला आठवडा गोंधळानेच गाजला. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, रिया चक्रवर्ती प्रकरण, कंगना रनौतचा वादविवाद, माध्यमांचे वार्तांकन अशा अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. त्यातच कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
- अशोक पानवलकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
आज सरत असलेला आठवडा भलताच वादळी ठरला. आठवड्याची सुरुवात महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाने झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या खडाखडीशिवाय त्यात काय हाती लागले हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुद्देसूद भाषण आणि त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर हा अधिवेशनाचा विशेष भाग ठरला. विधिमंडळात भांडणे चालू असताना बाहेर रिया चक्रवर्ती आणि नंतर कंगना रनौत या दोन अभिनेत्रींवरून बरेच नाट्य घडले . रियाला जामीन नाकारल्यानंतर आणि कंगनाप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर खुद्द शरद पवार यांनी केलेल्या टिप्पणीमुळे नंतर सगळ्यांची तोंडे बंद झाली आणि पुढचा एपिसोड सोमवारपासून असे चित्र दिसायला लागले. कारण कंगनाच्या कथित अमली पदार्थ सेवनाबद्दल आता चौकशी सुरु होणार आहे अशी बातमी कालच प्रसिद्ध झाली आहे. या सर्व भानगडींमध्ये महाराष्ट्र कोरोना नावाच्या भीषण समस्येशी सामना करत आहे हे जणू विसरून जायला झाले. रोज रात्री महाराष्ट्रातल्या नव्या कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून मात्र डोळे खाडकन उघडायचे. रोज वीस हजाराच्या वर नवे रुग्ण सापडत आहेत (शनिवारचा आकडा २२,०८४ रुग्ण व ३९१ मृत्यू असा होता ) याबरोबरच मृत्यूंमधील वाढ खूपच चिंताजनक आहे. राज्य सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यात सगळे आलबेल आहे असे स्वतः मुख्यमंत्रीही म्हणणार नाहीत, पण बाकीचे विषय बाजूला सारून आता कोरोनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे मात्र नक्की.
या बाबींबरोबरच आणखी एका महत्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित झाले होते. तो म्हणजे टीव्ही मीडिया. ज्या पद्धतीने टीव्हीचे पत्रकार रियाभोवती गर्दी करत होते, ज्या पद्धतीने आरडाओरडा चालला होता तो सर्वार्थाने अनाठायी होता. रियावर काही आरोप आहेत, ती दोषी असली तर तिला शिक्षा होईल, त्यात माध्यमांनी पडायचे कारण नाही. परंतु काही वाहिन्या स्वतःला एवढ्या शक्तिशाली समजतात की न्यायालयाची गरजच नाही, आम्हीच खटला चालवू आणि ‘न्याय ‘ही आम्हीच देऊ. या प्रवृत्तीचे वर्तन काही टीव्ही वाहिन्यांचे होते. मूळ मुद्दा होता तो अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत ती चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली. आता याविषयी कोणीच बोलत नाही, मधल्या मध्ये मुंबई पोलीस मात्र बदनाम झाले. आता सारा फोकस आहे तो अमली पदार्थ सेवनावर. म्हणजे मूळ प्रकरण राहिले बाजूला, वाद वेगळ्याच विषयावर चालू आहे.
मागे वेगळ्या संदर्भात , माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही टीव्ही माध्यमाला संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने एका वेगळ्या प्रकरणात, ”ज्यांना ऍक्शन चित्रपट बघायची हौस आहे , त्यांनी त्याऐवजी टीव्हीवरील चर्चा बघाव्यात ”, असे म्हटले होते. आरडाओरडा न करता एखाद्या मुद्द्यावर नीट चर्चा करता येते हेच काही टीव्ही चॅनेलना कळत नाही, किंवा कळूनही वळत नाही ! आपले मत आधीच ठरवायचे आणि त्या अनुषंगाने चर्चा घडवून आणायची असेच जणू ठरलेले असते. वर्तमानपत्रे असोत वा टीव्ही चॅनेल्स , जे घडते आहे ते लोकांसमोर मांडावे ही अपेक्षा असते. त्याऐवजी आम्ही सांगू ते सत्य, अशीच भूमिका ठेवून काही चॅनेल्स वावरत असतात. आपली विश्वासार्हता कमी झाली आहे याचे भान या चॅनेलना राहिलेले नाही. अनेक घरांमध्ये ही चॅनेल्स लावलीही जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तरीही आपलेच चॅनेल कसे नंबर वन आहेत हे सतत सांगितले जाते.
वर्तमानपत्रे असोत अथवा टीव्ही माध्यमे, संपादकीय भूमिका आणि व्यावसायिक भूमिका यात फरक हवा. तो राहिलेला नाही. वर्तमानपत्रांमध्ये जसे ‘जितका खप जास्त, तितक्या जाहिराती जास्त मिळतात, तेवढा पैसा अधिक मिळतो ‘, असे सूत्र असते, तेच टीव्ही माध्यमांबाबत घडते. टीआरपी नावाचे भूत सगळ्यांच्या मानेवर बसले आहे. आपले चॅनेल लोकांनी बघत राहावे यासाठी काहीवेळा काहीही दाखवले जाते. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी करणे अत्यंत चुकीचे होते. कंगना प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत , त्यांनी केलेल्या कारवाईबाबत प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. मुंबईत इतकी अनधिकृत बांधकामे आहेत हे काही गुपित नाही, तरीही कंगनाचे घर आधी टार्गेट केल्याने वाद उद्भवणे स्वाभाविक होते. परंतु त्याचवेळी , कंगनाने केलेला एकेरी उल्लेख मराठी चॅनेलही वारंवार दाखवत होते. आपल्या मुख्यमंत्र्यांचा अपमान सतत कशासाठी दाखवायचा ? स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी, हे उघड आहे. कंगनाच्या मुंबईबद्दलच्या विधानाचा निषेध करायला हवा तसाच मुख्यमंत्र्यांबद्दलच्या एकेरी उल्लेखाचाही , यात दुमत असताच कामा नये. परंतु हेच वारंवार दाखवून टीव्ही माध्यमे काय साध्य करू पाहात आहेत ?
गेल्या दशकभरात जसजशी टीव्ही चॅनेलची संख्या वाढत गेली तसतशी त्यांच्यातली स्पर्धाही वाढत गेली. माध्यमांचे स्वरूप बदलले. वाढीव जाहिराती आणि त्या अनुषंगाने मिळणार पैसा महत्वाचा असल्याने काही चॅनेलची काम करण्याची पद्धत बदलली. हेच आता नको त्या स्वरूपात दिसत आहे. गेल्या आठवड्यात एक विडिओ व्हायरल झाला होता. कंगनाच्या घरातून बाहेर पडलेल्या पोस्टमनला तो कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग पाडायला आलेल्या महापालिकेचा कर्मचारी असल्याचे समजून टीव्ही पत्रकार प्रश्नांचा भडीमार करू लागले. ‘मी पोस्टमन आहे, मला काहीही माहीत नाही,” असे तो सांगत होता, तरी पत्रकारांना भानावर यायला वेळ लागला. अशी पत्रकारिता अपेक्षित नाही. रियाला चौकशीसाठी नेताना तिच्याभोवती घातलेला गराडा हेही चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. त्यांच्या टीव्ही चॅनेलला काहीही करून ‘ब्रेकिंग न्यूज ‘हवी असते, त्यासाठी त्यांचा स्वतःच्या पत्रकारांवर दबाव असू शकतो, हे मान्य केले तरी ज्या पद्धतीने काही टीव्ही चॅनेल वागली ते अजिबात समर्थनीय नव्हते . मुळात कंगनाच्या वक्तव्याकडे किती लक्ष द्यायचे हाच प्रश्न आहे. अशा व्यक्तींकडे सतत लक्ष दिल्याने त्यांचे महत्व वाढते. जगातल्या प्रत्येक प्रश्नावर आपले मत द्यायलाच हवे असे समजून पक्षप्रवक्ते बोलत राहिले तर असेच होणार, हे उघड आहे. एवढे होऊनही कंगनाने तिचे ट्विट थांबवले नाहीत, ती सतत काही तरी कंमेंट्स करतच आहे. आज ती राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यानंतर या प्रकरणाला काय वळण लागते ते पाहावे लागेल.
टीव्ही चॅनेलनी स्वतःकडे न्यायालयाची भूमिका घेतल्याने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. भारतात नॅशनल ब्रॉडकास्टींग एजन्सी अस्तित्वात आहे. व्हिजुअल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांचे आहे. परंतु हे नियंत्रण ते ठेवत आहेत असे टीव्ही वाहिन्या पाहून वाटत तरी नाही. बीबीसीसारख्या टीव्ही वाहिन्यांत एखाद्या कार्यक्रमात अँकरने कसे वागावे याचे नियम ठरलेले आहेत. समोरच्या माणसाशी अदबीने वागावे लागते, त्याचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे लागते. हे न झाल्यास कायदेशीर दाद मागता येते. हा नियम आपल्याकडे आल्यास काय होईल ते मी सांगायला नको. बीबीसी, सीएनएन, अलजझीरा किंवा तशा वाहिन्यांमध्ये कधीही आक्रस्ताळेपणा दिसत नाही. तरीही प्रत्येक चॅनेलची स्वतःची बाजू ठळकपणे जाणवत राहाते. सीएनएन असो, न्यूयॉर्क टाइम्स असो, त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे, पण ती मांडण्यासाठी त्यांना आरडाओरडा करावा लागत नाही.
टीव्ही चॅनेल व वृत्तपत्रांची लोकांचे प्रश्न मांडले तर त्यांचा खऱ्या अर्थाने टीआरपी वाढेल. या संदर्भात काही लोक माध्यमांनी लोकांचे प्रश्न मांडले पाहिलेत असे म्हणतात, पण स्टुडिओत गेल्यावर मात्र ते टीआरपी वाढविण्याच्या मागे लागतात अशी टीका एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने केली होती. हे खरे आहे. आता कोरोना हे सर्वांचे टार्गेट असले पाहिजे, रिया, कंगना वगैरे बाबी न्यायालये बघून घेतील. कोरोना येऊन सहा महिने उलटले तरी आपल्याकडे त्याचा सामना करण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभी राहिली नाही, हा विरोधी पक्षांचा आरोप केवळ ‘विरोधक असेच बोलणार ‘ असे समजून दुर्लक्ष करण्यासारखा नाही.
पण लक्षात कोण घेतो ?