सटाणा – रब्बी हंगामास सुरुवात झाली असून थंडीच्या कडाक्यात बळीराजा रात्री अपरात्री शेतपिकांना पाणी देण्यासाठी जात असल्याने राज्यात अनेक शेतकऱ्यांना आपले जीव ही गमवावे लागले आहेत. नुकत्याच घडलेल्या जालना जिल्ह्यातील पळसखेड पिंपळे (भोकरदन) मधील एका घटनेत तिघा शेतकरी भावडांचा मृत्यु झाला आहे. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेत रब्बी हंगामात शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा करावा या आशयाची मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
शेतीपंपाला वीजपुरवठ्या संदर्भात माहिती देतांना माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी सांगितले आहे की, शेतकऱ्यांसाठी खरीपा नंतर रब्बी हंगाम हा सर्वाधिक महत्वाचा असुन रब्बी मधील गहू ,हरभरा ,कांदा ,व अन्य पिकांसाठी शेतकऱ्याला पिकांना पाणी द्यावे लागते.यासाठी शेतकऱ्यांना लोडशडिंगचा सामना करावा लागतो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या जीवाची पर्वा करीत पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागते. अशावेळेस जंगली श्वापदांचा हल्ला होण्याची शक्यता असते. अनेकदा सर्पदंश, इलेक्ट्रीक शॉक सारख्या गोष्टीचा सामना करावा लागतो. तर काही कुटुंबांचे घरातील कर्ता पुरुषच गेल्याने काही कुटुंबाची वाताहत ही झाली आहे. त्यामुळे सरकारने व वीजवितरण कंपनीने शेतकऱ्यांना थ्रीफेज विद्युत पुरवठा हा दिवसा करावा जेणेकरून शेतकरी कुठल्या ही अनुचित घटनेचा बळी ठरणार नाही. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्जा मंत्री नितीन राऊत व ऊर्जा सचिव यांची भेट घेऊन शेतीपंपाला दिवसा किमान आठ तास वीज पुरवठ्याची मागणी करणार असल्याचे माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी सांगितले.