पिंपळगाव मोर- पर्यटन व ट्रेकिंगसाठी नाशिक जिल्ह्यात तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अनेक किल्ले आहेत.नाशिकहून तसेच मुंबई-पुणे आदी भागांतून विशेष पर्यटक मुक्कामी राहून आपली किल्ले सर करण्याची मोहीम फत्ते करतात.पर्यटकांना मोहित करून घेणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या रतनगड किल्ल्याला सुमारे ७०० किलो वजनाचा, दोन फळ्यांचा सागवानी दरवाजा नगरच्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे बसविण्यात आला. ‘सह्याद्री’च्या दुर्गसेवकांनी अतिशय दुर्गम रतनगड किल्ल्यावर नेऊन तेथील त्र्यंबक दरवाजा लावला. तत्पूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे दगड-माती, पालापाचोळा साफ केला. साधारण वर्षभरापूर्वी दरवाजाचे मोजमाप घेतले होते. त्यासाठी निधीसंकलन केले.भंडारदरापासून २३ कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असला तरी तो अहमदनगर जिल्ह्यात येतो.
कोविडमुळे सर्व काही ठप्प असताना भास्कर गोरे यांनी दरवाजा बनविण्याचे काम सुरू ठेवले होते.सागवानी लाकडात, रायगडाच्या दरवाजाच्या प्रतिकृतीत हा दरवाजा तयार केला. त्यासाठी २ लाख ६० हजार रुपये खर्च आला. सह्याद्री दुर्गसंवर्धन विभागाचे राज्य अध्यक्ष गणेश रघुवीर यांच्या मार्गदर्शनाखाली २३ तारखेला हा दरवाजा रतनवाडी
येथे नेला.दरवाजा पायथ्यापर्यंत नेण्यासाठी राज्यभरातून ३०० दुर्गसेवक आले होते.डोक्यावर उचलून पायथ्यापर्यंत ८ किलोमीटर व नंतर दोन किलोमीटरचा डोंगर पार करीत, हा महाकाय दरवाजा, तब्बल साडेपाच तासांचा प्रवास करीत रतनगडावर नेला खरा; मात्र तेथे तांत्रिक अडचण आल्याने सेवकांना तीन रात्री व चार दिवस गडावर थांबावे लागले. ३० तारखेला रात्रभर दुर्ग गोंधळ घालण्यात आला. भंडारा उधळत रात्र जागविली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिकभाऊ गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गसंवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांच्यासह नगर जिल्ह्यातील दुर्गसेवकांचे सहकार्य लाभले. त्यात शंकर शिंदे, धनंजय काळे, संतोष गजे, भूषण पवार, दिलीप सोनवणे, राज सोनवणे, ऋषिकेश कानकाटे आदी दुर्गसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरवाजा बसविण्यासाठी राज्यभरातील ‘सह्याद्री’चे दुर्गसेवक उपस्थित होते. सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाला भंडारा उधळत दरवाजा बसविण्यात आला. दुर्गसेवकांनी जल्लोष केला. सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गिरीश मालपाणी पत्नी सोनालीसह उपस्थित होते.
● सुमारे ३०० दुर्गसेवक
● ८ किलोमीटर पायी प्रवास
● तीन दिवस चार रात्रीचा गडावर मुक्काम