मुंबई – उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन ही एक सामान्य समस्या झालेली आहे. अगदी ३० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुष आणि महिलांना हा त्रास होतो. हल्लीच्या काही वर्षांमध्ये हाय.बी.पी. च्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. रक्तदाबाची माहिती आणि त्यावर उपाय….
अशी आहे आकडेवारी
देशात आज उच्च रक्तदाबाचे किमान २० कोटी रुग्ण आहेत. यांपैकी केवळ २ कोटी लोक आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि उर्वरित १८ कोटी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, असे डॉक्टर्स सांगतात. लोक उच्च रक्तदाबासारखा गंभीर विषय खूप सहज घेतात. अनेकांना तर स्वतःच्या उच्च रक्तदाब असल्याची माहितीही नसते.
रक्तदाब चाचणी आवश्यक
विशेषज्ञांच्या मते ३० वर्ष वयानंतर नियमित स्वरूपात रक्तदाब चाचणी केली पाहिजे. सामान्यतः १४०/९० च्या वर रक्तदाब असेल तर त्याला हायपरटेन्शन असे मानले जाते. १८०/१२० आणि त्यावर रक्तदाब असल्यास हे अतिशय गंभीर मानले जाते. मात्र बहुधा हायपरटेन्शनची काहीही पूर्व लक्षणे दिसून येत नाहीत. याकडे सारखे दुर्लक्ष केले तर हृदयविकार किंवा स्ट्रोक म्हणजेच झटका येण्याची शक्यता असते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली जाऊ शकते आणि ते प्रभावीही असते. यासाठी खालील पाच गोष्टींचे सेवन जरूर करावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
अर्जुनाची साल
अर्जुन वृक्षा च्या सालीमध्ये अँटी- हाइपरटेंन्सीव्ह गुण आढळतात. याशिवायसुद्धा अर्जुनाच्या सालीमध्ये अँटीप्लेटलेट, अँटी-इस्किमिक, अँटी ऑक्सीडेंट, आणि इनोट्रोपिक या समवेत अन्य अनेक गुण असतात. सामान्यतः अर्जुनाची साल ही पूड स्वरूपात उपलब्ध असते. सकाळी उपाशीपोटी ही पूड सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
त्रिफळा
हरीतकी, आवळा आणि बिभितक या तीन फळांचे मिळून त्रिफळा तयार होते. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे रक्तदाब नियंत्रित करतात. दररोज दोन चमचे त्रिफळा चूर्ण सेवन केल्यास रक्तदाबाबरोबरच उच्च कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहते.
आवळा
दररोज रिकाम्या पोटी एक आवळा खाण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. रक्तदाब नियंत्रणासाठी हे अतिशय प्रभावी मध्यम आहे. आवळा फळ स्वरूपात उपलब्ध नसेल तर आवळ्याचे ज्यूस सुद्धा घेता येईल.
तुळस
तुळशीच्या पानांमध्ये युजिनॉल नावाचे द्रव्य असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तुळशीच्या पानाचा चहा पिल्याने सुद्धा फायदा होतो.
अश्वगंधा
तणाव हे रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. तणावामुळे आलेला रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर अश्वगंधा एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अश्वगंधा सेवन केल्याने प्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक पेलाभर कोमट पाण्यात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.