सोशल डिस्टंसिंग पाळत १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
नव्या कार्यकारिणीची घोषणा करत संकट काळात सायकलिस्टचे सामाजिक भान
नाशिक : कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र रक्तदान करण्याचे आवाहन केले जात असताना नाशिक सायकलिस्टसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र वानखेडेंच्या एका हाकेवर तब्बल १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शनिवारी (दि. २५) अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने पंडित कॉलनीतील लायन्स क्लब हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एनसीएफच्या सदस्यांमधील सामाजिक भान या संकटकाळातही जागृत असल्याचे दिसून आले.
मागील एका आठवड्यापासून नाशिक सायकलिस्टसने एका संदेशातून रक्तदानासाठी पुढे येण्याचे आव्हान केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांची गरज भासू लागली आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या तीन महिन्यापासून रक्तदाते पुढे आले नाही त्यामुळे थॅलेसेमिया पेशंट तसेच कॅन्सर पेशंट हे बऱ्याच दिवसापासून वेटिंगवर होते. खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी अनेकवेळा रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने सोशल डिस्टंसिंग पाळत कसे नियोजन करता येईल यावर भर देण्यात आला.
सुमारे १०० पिशव्या रक्त संकलित करू असा निश्चय वानखेडे यांनी केला. एका संदेशाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनात रक्तदानासाठी नोंदणी करून रक्तदात्यांना विशिष्ट वेळ देण्यात आली होती. त्यानुसार नोंदणी केलेल्यांसहित ऐनवेळी आलेल्या प्रत्येकाची थर्मल टेस्ट, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी मोजणे आणि सॅनिटाईझ, मास्कचे वाटप करत हे रक्तदान शिबीर पार पडले. एकूण १२५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे प्रथमच रक्तदान करणारे 28 रक्तदाते हे या मोहिमेत स्वतःहून सहभागी झाले. महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला.
नाशिक सायकलीस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्यामुळे रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले. एवढे काळजीचे वातावरण असताना सायकलिस्टससदस्य व नाशिककरांनी या शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. याहीपुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा रक्तदान शिबीर घेण्यात येईल असे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी सांगितले.
प्रत्येकाची थर्मल टेस्ट तर प्रत्येकवेळी बेड सॅनिटाईझ
प्रत्येक रक्तदात्यांची थर्मल टेस्ट येवेळी करण्यात आली. वैष्णवी डिस्ट्रिब्युटर्सच्या साहाय्याने संपूर्ण परिसर तसेच प्रत्येकास सॅनिटायझर, मास्क, प्रत्येक बेडची स्वच्छता व सॅनिटायझेशन यावेळी करण्यात येत होते. डॉ. नितीन रौंदळ यांच्यामार्फत मेडिकल किट उपलब्ध करण्यात आले होते.
रक्तदात्यांना कोविड योद्ध्याचे सर्टिफिकेट
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे रक्तदात्यास कोव्हीड योद्धा असे विशेष सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले. या संकटकाळात व काळजीच्या वातावरणात रक्तदाते पुढे आले. अर्पण रक्तपेढीचे सीईओ डॉ. शशिकांत पाटील यांनी कोरोनाच्या काळात बऱ्याच महिन्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे आले नव्हते. परंतु आज मोट्या संख्येने रक्त संकलित झाल्यामुळे आम्ही गरजू रुग्णांपर्यंत पोहचवु असे मनोगत व्यक्त केले.
एनसीएफच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा
सामाजिक उपक्रम राबवुन राजेंद्र वानखेडे यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नवीन कार्यकारिणीची घोषणा देखील करण्यात आली. चंद्रकांत नाईक, डॉ. आबा पाटील, योगेश शिंदे, उमेश भदाणे यांची उपाध्यक्ष पदी, सचिव डॉ. मनीषा रौंदळ तर खजिनदार पदी रवींद्र दुसाने यांच्याकडे जबाबदारी देण्यात अली आहे. तर दविंदर भेला, श्रीराम पवार, मोहन देसाई, सुरेश डोंगरे, माधुरी गडाख, संदीप गायकवाड, किशोर माने, गणेश कळमकर, संजय पवार, यशवंत मुधोळकर, प्रशांत भागवत, गणेश माळी, नितीन कोतकर, किशोर शिरसाठ, प्रकाश दोंदे यांची कार्यकारिणी सदस्यपदी वर्णी लागली.