रंगुनी रंगात साऱ्या…
नवरात्रोत्सव आणि नवरंगांची उधळण हे समीकरण अलीकडच्या काळात घट्ट झाले आहे. यावेळी प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो. तो साड्या, कपड्यांच्या स्वरूपात परिधान केला जातो. कविवर्य सुरेश भट यांची रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा… ही कविता प्रसिद्ध आहे.हे काव्य आत्ताच आठवण्याचे कारण म्हणजे आदिवासी वारली चित्रकलेमध्ये निसर्गात विविध रंग असतानाही परंपरेनुसार केवळ पांढऱ्या रंगाचाच वापर केला जातो. अलीकडे तरुण वारली चित्रकार विविध रंगांचा वापर करतांना आढळतात. मात्र तो देखिल फक्त पार्श्वभूमीसाठीच होतो. मुख्य चित्र व त्यातील आकृत्या पांढऱ्या रंगछटेतच रंगवतात. तरीही त्यात रंगांचा अभाव जाणवत नाही हे विशेष !
आदिवासी वारली चित्रशैलीत पांढऱ्या रंगाचाच वापर का होतो असा प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. मुळात ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या आदिम कलेच्या निर्मितीसाठी तांदळाचे पांढरेशुभ्र पीठ वापरले जाते. आपल्या झोपडीच्या भिंतीवर शेणाने सारवून त्यावर वारली महिला चित्र रेखाटतात. काहीवेळा गेरूने पार्श्वभूमी गडद केली जाते. त्यावर पांढरा रंग अधिकच उठून दिसतो. भारतातील सर्वच लोककलांमध्ये परिसरातील सहज उपलब्ध साहित्याचाच वापर होतो. आदिवासी वारली जमातीत प्रत्येकाची भातशेती असते. त्यामुळे तांदूळ उपलब्ध असतात. झोपडीची भिंत हाच कॅनव्हास, तांदळाच्या पिठाचा रंग आणि बांबूची काडी, खजुरीचा काटा यांचा ब्रश म्हणून उपयोग केला जातो. महाराष्ट्रातील वारली कलेप्रमाणेच राजस्थानात मांडणा लोककला प्रसिद्ध आहे. त्यात रंगासाठी चुन्याचा वापर करतात. त्या भागात चुन्याच्या खाणी असल्याने चुना मुबलक असतो. भिंती व जमिनीवर चुन्याने मांडणा काढण्यात येतात. बिहारमधील मधुबनी लोककलेत नैसर्गिक रंग वापरतात. ते रंग तेथील कलावंत स्वतःच तयार करतात. अलीकडे फॅब्रिक कलर्स व रंगीत शाई वापरून हॅन्डमेड पेपरवर मधुबनी चित्रे रंगतात. आपल्या देशाला वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचा मोठा वारसा लाभलेला आहे. भारतातील इतरही अनेक लोककला अशाच साधेपणाने सजतात. समृद्ध परंपरा पुढे नेतात.
ऑस्ट्रेलियातील अबोर्जनीज म्हणजे तेथील आदिवासींची कला प्रसिद्ध आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वारली कलेशी त्या कलेचे खूप साम्य दिसते. ते देखील प्रामुख्याने चित्रांकनासाठी पांढऱ्या रंगाचाच उपयोग करतात. मात्र पार्श्वभागी विविध रंग असतात. अर्थात त्यात अर्दन कलर्सच्या रंगछटांंचा आवर्जून वापर होतो. म्हणजेच जमिनीशी, मातीशी एकरुप होणारे पिवळा, मातकट लाल, राखाडी, तपकिरी,काळसर तांबडा, केशरी हे रंग वापरलेले दिसतात. हजारो मैलांवरील या आदिवासी कलांमध्ये खूपच साम्यस्थळे आहेत. वास्तविक दोन्हीही भिन्न संस्कृतीच्या दोघांनाही परस्परांविषयी काहीही माहिती नसताना दिसणारे हे साम्य बघणाऱ्या रसिकांना स्तिमित करते. असे साम्य असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मूळ मानवी प्रेरणा जगाच्या पाठीवर सर्वत्र सारख्याच असतात. त्यात बदल होत नाही. दुपार झाल्यावर भूक लागते. रात्री अंधार पडल्यावर झोप येते. मिलनोत्सुक युवक युवतींना परस्परांबद्दल ओढ वाटते. हे जेव्हढे नैसर्गिक आहे तेव्हढेच चित्रे रेखाटावी असे वाटणे व चित्रांतून संवाद साधणे हे देखील स्वाभाविक आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केला तर सर्व रंग एकत्र केले तर त्यातून पांढरा रंग निर्माण होतो. प्रत्यक्षात सर्व रंग एकत्र कालवले तर काळा रंग तयार होतो. म्हणूनच पांढरा व काळा हे रंग नसून त्या रंगछटा आहेत. कोणत्याही रंगात पांढरा रंग मिसळला तर उजळ तर काळा रंग मिसळला तर गडद रंगछटा निर्माण करता येतात.
वारली जमातीने रंगांची मर्यादा खुशीने स्वीकारली आहे. चित्रणासाठी पांढऱ्या शुभ्र रंगाचाच प्रामुख्याने वापर होतो. त्याबरोबरच नैसर्गिक रंगज्ञानही त्यांना निश्चित आहे. सप्तरंगातील मोजकेच रंग ते वापरतात. शेणाचा पिवळसर हिरवा, क्वचित रंगीत माती आणि बऱ्याचदा गेरू रंग यांनी पार्श्वभूमी सजते. त्यावर पांढरा रंग अधिकच खुलून दिसतो. काहीवेळा दुष्ट अघोरी शक्तींना दूर ठेवण्यासाठी काळ्या रंगाचा उपयोग होतो. लाल रंगाला नारनदेवाचा आशीर्वाद मानतात तर हळद व कुंकू हे समृद्धीचे प्रतीक समजले जाते.अशाप्रकारे वारली चित्रशैली विविध रंगसंकेतांनी समृद्ध आहे. अलीकडे डहाणू, पालघर, तलासरी, जव्हार या भागातील तरुण वारली चित्रकार जलरंग, तैलरंग व अक्रेलीक कलर्स वापरून चित्रे काढण्याचा सराव करतात. मात्र तेही कटाक्षाने पांढऱ्या रंगातच चित्र, आकृत्या रंगवतात. सुखाचे, आनंदाचे, प्रकाशाचे, पावित्र्याचे, निर्मळतेचे प्रतिक असणारा पांढरा शुभ्र रंग निरागस भाव प्रकट करतो. त्यातून जीवन सुंदर करण्याची प्रामाणिक धडपड व्यक्त होते. धवल यश, धवल वृत्ती, धवल विकास, पांढरेशुभ्र चारित्र्य असे शब्दप्रयोग व्यवहारात आपण नेहमीच करतो. अशाच धवल रंगछटेत वारली चित्र रंगते.सौंदर्य ही केवळ रंगांचीच मक्तेदारी नाही हे स्पष्ट करते.म्हणूनच पांढऱ्या रंगछटेविषयी रुबाब माझा वेगळा असेच म्हणावे लागते.साध्यासोप्या वारली चित्रशैलीला तसाच साधा पांढरा रंग अतिशय पूरक ठरतो !
आशय विषयांचे नावीन्य
वारली चित्रांमध्ये तोचतोचपणा असतो असा एक आरोप केला जातो. तोच पांढरा रंग, तेच ते आकार, ठराविक विषय या चौकटीच्या बाहेर वारली चित्रे जात नाहीत असे अनेकजण म्हणतात. पण हे समजून घेतले पाहिजे की, वारली जमातीने या मर्यादा स्वखुशीने स्वीकारलेल्या आहेतता कोणी लादलेल्या नाहीत. उपलब्ध सामग्रीच्या सहाय्याने वारली चित्रकार नवे विषय, आशय उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत. डोळसपणे बघितले तर हे नावीन्य चित्रांमधून सामोरे येते. शहरात येणारे आदिवासी तरुण नवे विश्व अनुभवतात. त्यावर विचार करून नवनव्या गोष्टी आकर्षकपणे चित्रात मांडतात. असाच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील कृष्णा भुसारे हा युवक कॅनव्हासवर वारली चित्रांचे नवनवे प्रयोग करतो. त्याने वेगवेगळ्या ऋतूंचे सुरेख चित्रण केले आहे.उन्हाळ्यातील तप्त वातावरण, बैलगाडीतून तसेच पायी निघालेले कुटुंब याचे सुरेख रंगीत चित्र त्याने रेखाटले आहे.पावसाळ्यातील हिरव्यागार निसर्गाचे वरदान, विविध रंगछटांंनी नटलेला परिसर यांचे बहारदार चित्रण त्याने केले आहे. ते बघितल्यावर रसिकांना वेगळीच अनुभूती मिळते. कालानुरूप वारली चित्रशैली नवे रुप धारण करतेय याचा प्रत्यय येतो.
(लेखकाशी संपर्क – ९४२२२७२७५५)