.मनाली देवरे, नाशिक
या आयपीएल सिझनमध्ये नवीन नाव धारण करून खेळणा–या पंजाब किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स विरूध्दचा आपला पहिला मुकाबला चार धावांनी जिंकला. २२३ धावाचे मोठे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अवघ्या ४ धावा कमी पडलेल्या राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला असला तरी या संघाने आज माञ क्रिकेटच्या चाहत्यांची मने जिंकली हे निश्चीत.
सेनापतीने युध्द लढतांना मागे राहून चालत नाही. राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार संजु सॅमसनला याची चांगली जाणीव होती. २२३ या मोठया धावसंख्येचा पाठलाग करतांना मनन व्होरा आणि बेन स्टोक हे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर संजु सॅमसनने खेळपटटीवर पाय रोवले. जॉस बटलर (२५), शिवम दुबे (२३) आणि रियान पराग (२५) यांनी माफक खेळी तर केली. परंतु, ते खेळपट़टीवर जास्त काळ उभे राहू शकले नाहीत. यांच्यापैकी एकाही खेळाडूने दुस–या बाजुने संजुला सोबत दिली नाही. अगदी आठव्याच षटकात संजु सॅमसनचा सोडलेला सोपा झेल पंजाब किंग्जसाठी चांगलाच महागात पडला असता.
त्याआधी राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी दिली होती. श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, रियान पराग, शिवम दुबे हे नवखे गोलंदाज तर अपयशी ठरलेच. परंतु, त्यास बरोबर लिलावात सगळयात जास्त पैसे देवून विकत घेतलेला ख्रिस मॉरीस, मुस्तफिजुर रहेमान, बेन स्टोक्स अशा एकूण ८ गोलंदाजाचा वापर करून देखील राजस्थान रॉयल्सला पंजाबच्या फलंदाजीवर नियंञण ठेवता आले नाही. अपवाद फक्त चेतन सकारीयाचा. आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात त्याने ३ बळी घेतले. या सिझनमध्ये २० षटकात प्रथमच एका संघाने २०० धावांचा टप्पा पार केला. अवघ्या २८ चेंडूत ६४ धावा करणा–या दिपक हुडाने ६ षटकार आणि ४ चौकार खेचून ख्रिस गेल लवकर बाद झाल्याची उणीव पंजाबला भासू दिली नाही. के. एल. राहूल आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हे आयपीएल मधले समीकरण यावर्षी देखील कायम राहील याची झलक या सामन्यात मिळाली. सलामीच्या राहुलने ५० चेंडूत ९१ धावा केल्या. ख्रिस गेल ४० धावांवर बाद झाला हे राजस्थान संघाचे नशिब म्हणावे लागेल अन्यथा २० षटकाम २२१ पेक्षा जास्त धावसंख्या धावफलकावर झळकली असती.
प्रिती झिंटाच्या पंजाबने आता आपल्या संघाचे नाव बदलले आहे. प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करून सुध्दा या संघाला आयपीएलच्या इतिहासात एकदाही चषक जिंकता आलेला नाही. २०१४ साली हा संघ फायनल मध्ये पोहोचला होता इतकीच या संघाची ठळक कामगिरी. कदाचित नाव बदलले तर नशिब बदलेल, या हेतुने पुर्वीचा “किंग्ज इलेव्हन पंजाब” आता “पंजाब किंग्ज” या नावाने ओळखला जाणार आहे. हा शब्दांचा उलटफेर पंजाबसाठी खरोखर लक फॅक्टर ठरणार आहे काॽ हे पहाणे या स्पर्धेत औत्सुक्याचे ठरणार आहे. तिकडे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या वर्षात म्हणजे २००८ साली विजेतपद पटकावले होते. त्यानंतर या संघाला १४ वर्षांच्या आयपीएल इतिहासात किमान फायनल सुध्दा गाठता आलेली नाही, विजेतेपद तर दुरच राहीले. यावर्षी रॉयल्सच्या टीम मॅनेजमेन्टने एक हटके निर्णय घेतला आहे तो म्हणजे, या संघात जास्तीत जास्त नवख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून संजु सॅमसन सारख्या तरुण भारतीय खेळाडूच्या गळयात कर्णधारपदाची माळ टाकण्यात आली आहे. कर्णधार म्हणून पहील्याच सामन्यात त्याने आज शतक झळकावले आणि चांगली सुरूवात केली आहे. परंतु हा धाडसी बदल संघासाठी “रॉयल” ठरतो की “बुमरँग” ठरतो हे बघावे लागेल.
मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडीयन्स, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई