अहमदाबाद – भारतात प्रथमच सावली न दिसणारे स्टेडिअम सज्ज झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या मोतेरा स्टेडिअममध्ये एलईडी लाईट्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या लाईटसच्या प्रकाशात खेळाडूंना दिवसा खेळ सुरू असल्याचाच भास होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या डे-नाईट टेस्ट मॅच दरम्यान होणाऱ्या दिमाखदार सामन्यात हवेत असलेला बॉल सहज पाहता येईल, यासाठी मोतेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर आकर्षक एलईडी फ्लड लाइट बसविण्यात आले आहेत.
या संदर्भात माहिती देताना गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव अनिल पटेल म्हणाले की, हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून येथे ११ सेंटर पिच आणि जिमसह चार ड्रेसिंग रूम आहेत. मोतेरा स्टेडियमवर व्यापक पुनर्रचना झाली, तेव्हा सुरुवातीस बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह जेव्हा राज्य क्रिकेट युनिटचे अध्यक्ष होते. सध्या यामध्ये १ लाख १० हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असून ती मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा जास्त आहे.
जीसीए स्टेडियमवर पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी आतापर्यंत सुमारे ५५ हजार तिकीटे विक्रीवर ठेवली गेली. अलीकडेच मोटेरा येथे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते.जगातील हे एकमेव स्टेडियम आहे, ज्यामध्ये मुख्य मैदानावर ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या सह सरावासाठी आणि खेळपट्टीसाठी समान माती वापरुन खेळायोग्य केले आहे. तसेच सावल्या पडू नये यासाठी छतावर संपूर्ण मंडळामध्ये एलईडी दिवे बसविले आहेत.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना येथे खेळला जाणार असून तिसरा सामना डे-नाईट असेल. भारत आणि इंग्लंड पहिल्यांदा डे-नाईट कसोटी सामना खेळतील.
महत्त्वाचे म्हणजे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खेळले गेले आहेत. ज्यात इंग्लंडने पहिल्या सामन्यात २२७ धावांनी विजय मिळविला होता, तर दुसरा सामना टीम इंडियाने ३१७ धावांनी जिंकला होता. आता दोन्ही संघ मालिकेत १-१ असे बरोबरीत आहेत.