हर्षल भट, नाशिक
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र्रातील हौशी रंगकर्मी यात सहभागी होत असतात. गेल्या वर्षीची स्पर्धा उलटून आठ महिने उलटूनही खर्चाची रक्कम संस्थांना मिळाली नाही. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता नाट्यगृह उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नसल्याने हौशी रंगकर्मी व संस्था कात्रीत सापडल्या आहेत.
सहभागी होणाऱ्या कलाकाराला सादरीकरणाची ठरविक रक्कम दिली जाते. नवख्या कलाकारांना याबद्दल माहिती नसल्याचे नव्याने समोर आले आहे. त्यामुळे कलाकारांच्या नावे मिळणारी रक्कम नक्की कुठे जाते अशी चर्चा नाट्यवर्तुळात सुरु आहे. खर्च केलेली रक्कम परत मिळेल व त्यातूनच पुढल्या वर्षी नाटक करता येईल, असे गणित असल्याने कलाकारांचा यंदा हिरमोड झाला आहे. नाटक उभे राहतांना लाखो रुपये खर्च होतात. यंदा स्पर्धा संपून आठ महिने उलटूनही एकही रुपया संस्थांना मिळालेला नाही. स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम, प्रवास भाडे, सादरीकरणाची रक्कम अशा कोणत्याही प्रकारची रक्कम कलाकारांना अद्याप न मिळाल्याने नाट्यवर्तुळात तीव्र नाराजी आहे. येत्या काही दिवसात पैसे न मिळाल्याने स्पर्धेत नाटक करणे अशक्य आहे असे मत संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.
—
गेल्या वर्षी राज्यनाट्य स्पर्धा नोव्हेंबरमध्ये पार पडल्या. स्पर्धा उलटून आठ महिने झाले तरी कोणतेही पैसे कलाकार किंवा संस्थांना मिळालेले नाहीत. त्यामुळे कलाकारांमध्ये नाराजी आहे. शासनाने कलाकारांवर अन्याय करू नये. लवकरात लवकर कलाकार व संस्थांचे पैसे देण्यात यावे. किरकोळ रकमेसाठी कलाकार हतबल होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी.
– रमेश भोळे, रंगकर्मी
—
नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्पर्धांचे पैसे कधी मिळणार याच आशेवर सर्वजण आहेत. सध्या हा प्रश्न शासनाच्या वित्त विभागात असून शासनाने याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. लवकरात लवकर संस्थांना पैसे देण्यात यावे. शासनाने कलाकारावर अन्याय करू नये. स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदा पैसे मिळण्यासाठी एवढा विलंब झाल्याने संस्था व कलाकारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
– राजेश जाधव, स्पर्धा समन्वयक, नाशिक केंद्र