संबोधित करतांना नाईक यांनी योगासन स्पर्धांचे मूळ भारतीय योग परंपरेत असल्याचे सांगितले, जिथे गेल्या अनेक शतकांपासून अशा स्पर्धा घेतल्या जातात. ते म्हणाले, आजही अनेक स्तरांवर त्यांचे आयोजन केले जात आहे, परंतु स्पर्धांना राष्ट्रीय स्वरुप देण्यासाठी मजबूत आणि शाश्वत रचना अद्याप उदयाला आलेले नाही. ते पुढे म्हणाले की, योगासनाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा निर्णय योग क्षेत्राच्या हितधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर घेण्यात आला आहे. ते म्हणाले की योगासन योगाचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण घटक आहे, जो मानसिक-शारिरीक आहे आणि तंदुरुस्ती आणि सामान्य निरोगीपणातील कार्यक्षमतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे.
ते पुढे म्हणाले की, “योगासन हा एक क्रीडाप्रकार बनल्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि नवीन रणनीती या शाखेत सुनिश्चित होतील आणि आपल्या खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना या क्षेत्रात फलदायी व परिपूर्ण करिअर घडवण्याच्या दृष्टीने फायदा होईल”.
यावेळी किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, योगासनाला एक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाल्यामुळे यातून निर्माण होणारी स्पर्धा जगातील लोकांमध्ये योगाबद्दलची रुची वाढवतील. ते म्हणाले की, दोन्ही मंत्रालये योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून स्थापन करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. ते पुढे म्हणाले की, खेलो इंडिया आणि विद्यापीठ स्पर्धांमध्ये योगासनांना क्रीडा प्रकार म्हणून समाविष्ट करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि आम्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याचा समावेश करू. मात्र कोणत्याही खेळाचे उद्दिष्ट ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा हेच असते आणि ही प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात आहे. रिजीजू म्हणाले की, योगासन हा एक अतिशय सुंदर, आकर्षक आणि लोकप्रिय खेळ बनणार आहे.
आयुष सचिवांनी एक सादरीकरण देऊन स्पष्टीकरण दिले की योगासन क्रीडा प्रकाराला 4 स्पर्धा आणि 7 श्रेणींमध्ये पदके मिळण्याची शक्यता आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठी प्रस्तावित कार्यक्रमांमध्ये पारंपारिक योगासन, कलात्मक योगासन (एकल), कलात्मक योगासन (जोडी), लयबद्ध योगासन (जोडी), फ्री फ्लो / सामूहिक योगासन, वैयक्तिक सर्वांगीण – अजिंक्यपद आणि सांघिक विजेतेपदाचा समावेश आहे.
सचिवांनी माहिती दिली की पुढील पावले किंवा कामे आराखड्याचा आणि योगासन क्रीडा प्रकाराच्या भविष्यातील विकासाचा भाग बनतील:
“राष्ट्रीय वैयक्तिक योगासन क्रीडा अजिंक्यपद” (आभासी माध्यम) नावाची प्रायोगिक योगासन स्पर्धा.2021 च्या सुरूवातीला होणार आहे.
क्रीडा स्पर्धा, योगासन कार्यक्रमांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करणे.
योगासन स्पर्धेसाठी स्वयंचलित गुणांकन प्रणालीचा विकास.
प्रशिक्षक, रेफरी, परीक्षक आणि स्पर्धेचे संचालक यांचे अभ्यासक्रम.
खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरे.
योगासन क्रीडापटूंमधून अव्वल खेळाडू तयार करण्यासाठी तज्ज्ञ आणि अभ्यासकांना करिअर आणि सामाजिक दर्जा सुनिश्चित करणे
राष्ट्रीय स्पर्धा, खेलो भारत आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून ओळख मिळवून देणे.
योगासन क्रीडापटूंसाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे.