नवी दिल्ली – भारतीय योगा जगभरात पोहोचल्यानंतर आता आयुर्वेदसुद्धा वैश्विक ब्रँड बनणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गतच या वर्षी ऑक्टोबरमध्ये अहमदाबादमध्ये आयुर्वेदावर पहिलं आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित केले जाणार आहे. आयुर्वेदाला ब्रँडच्या स्वरूपात स्थापित करण्यासाठी विशेष लोगो आणि कलर कोड तयार केले जात आहे. आगामी संमेलनासाठी अहमदाबादला निवडण्यामागे विशेष उद्देश असल्याचं आयुष मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
दरवर्षी आयुष संमेलन
कानमध्ये चित्रपट महोत्सव आणि दावोसच्या विश्व आर्थिक मंचाच्या धर्तीवर अहमदाबादची ओळख आयुर्वेद संमेलनानं व्हावी, असा प्रयत्न केला जात आहे. अहमदाबादमध्ये दरवर्षी आयुषवर आंतरराष्ट्रीय संमेलन होणार आहे. त्यामध्ये भारत आरोग्य आणि विशेषकरून जीवनशैलीशी निगडित समस्यांवरील उपाचारामध्ये आपल्या प्राचीन उपचार पद्धतीच्या उपयोगितेचं प्रदर्शन करणार आहे.








