नाशिक – शिवसेना कार्यालयात नूतनीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसाद घेत राजकीय मतभेद नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पण, या भेटीमुळे राजकीय वर्तूळात मात्र ये रिश्ता क्या कहलाता है याचीच चर्चा रंगली.
शिवसेना महानगर प्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शालिमार येथील शिवसेना कार्यालयाचे नूतनीकरण केले. या नूतनीकरणानंतर रविवारी सत्यनारायण महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाच्या निमित्ताने भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अरुण शेंदुर्णी कर, जगन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी उपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले.
पण, भाजप नेत्यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. भाजपाचे माजी आमदार सानप यांनी सांगितले की, ही एक औपचारिक कार्यक्रमानिमित्त असलेली भेट आहे. यात कोणतीही राजकीय विषय नव्हते. प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राजकारणामध्ये मतभेद असू शकतात परंतु प्रत्यक्ष काम करताना हे मतभेद असू नये या तत्वानुसार आम्ही शिवसेना कार्यालयात असलेल्या समारंभात सहभागी झालो.