येवला – शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातकोरोनामुळे साधेपणाने व प्रशासनाचे नियम पाळून गणेश विसर्जन करण्यात आले. शहरात १३२ वर्षांची परंपरा असलेल्या धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाच्या गणरायाला सजवलेल्या ट्रॅक्टरवरून परंपरेप्रमाणे शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरून नेण्यात आले. प्रारंभी आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दुपारी तीन वाजता गंगादरवाजा येथील गणेश विसर्जन कुंडात मानाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कार्यकर्त्यांना आमदार नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लोणारी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी आदींच्या हस्ते मास्कचे वाटप आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर वापरण्याचा संदेश सजविलेल्या चित्ररथाद्वारे या मंडळाच्या वतीने देण्यात आला. यावेळी भिमराज नागपुरे, राजकुमार कासार, खलील शेख, योगेश देशमुख, हिरामण पराते, संजय कासार, विश्लेश पटेल आदी उपस्थिती होती.
१३१ वर्षांपासून शेवट विसर्जनाचा मान असलेला परदेशपुरा तालीम संघाच्या श्री गणेशाचे सायंकाळी साडे पाच वाजता विसर्जन झाले. या प्रसंगी तालीम संघाचे दिपक परदेशी, मंगल परदेशी, संजय जाधव, तकदीर परदेशी, माणिकलाल परदेशी, कैलास परदेशी, कुंदन परदेशी, संतोष परदेशी, बंटी भावसार, योगेश परदेशी आदी उपस्थित होते. शहरात पालिका प्रशासनाने कृत्रीम विसर्जन कुंड व मूर्ती संकलन केंद्र केलेले होते. शहरवासीयांनी आपल्या घरातील श्री गणेशाचे या ठिकाणी विसर्जन केले. तालुक्यातही १८ गावांमध्ये सार्वजनिक श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.