येवला – शहरातील पारेगाव रोड भागातील मध्यवर्ती भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला मारल्याची चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी केंद्राच्या दरबारचे कुलूप तोडले. दानपेटी फोडण्यासाठी त्यांना अर्धा तास प्रयत्न करावे लागले. लोखंडी रॉडच्या साह्याने दानपेटीचे कुलूप तोडत त्यांनी ३५ हजारांची रोकड चोरून नेल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केंद्र गेल्या मार्च महिण्यापासून बंद होते. दररोज ठराविक पुजारी सेवा करत होते. त्यामुळे दानपेटी जानेवारी महिन्यापासून उघडलीच नसल्याने रक्कम अधिक देखील असू शकते असे बोलले जात आहे. या चोरीची फिर्याद श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख दत्तात्रय जाधव यांनी येवला शहर पोलिसांत दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली. त्यानंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे, चंद्रकांत निर्मळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. केंद्र हे अत्यंत दाट लोकवस्तीच्या मधोमध असून तरी देखील ही धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे