येवला – शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलिस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे. शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली तेव्हापासून शहरातील नगरपरिषदेचे स्लॅाटर हाऊस (कत्तलखाना) बंद करण्यात आला आहे. असे असतांनाही शहरात अवैधपणे कत्तल सुरू असल्याची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी तर मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने छापा मारून शहरातून सुमारे ४५ जनावरे ताब्यात घेवून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. गेल्या पंधरा दिवसात शहरातून गोधनाची चोरी झाल्याने अवैध कत्तलीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील नांदगाव रोड परिसरात सदर अवैध कत्तल सुरू असल्याची चर्चा असून पोलिस प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे.