येवला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. ४३ हजार ५३० महिला व ५१ हजार ९३ पुरुष अशा एकूण ९४ हजार ६२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८४.३३ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसिलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. तालुक्यात सर्वाधिक मतदान मुरमी येथे ९५.६५ टक्के तर सर्वात कमी मतदान मुखेड येथे ७७.०१ टक्के झाले.
तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या होत्या. यात ८ ग्रामपंचायतींसह एकूण १८९ सदस्य प्रतिस्पर्ध्याअभावी बिनविरोध झाले आहेत. तर ६१ ग्रामपंचायतींच्या ४६४ जागांसाठी शुक्रवारी, (दि. १५) मतदान झाले. मतदान प्रक्रियेसाठी तहसिलदार तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांचे मार्गदर्शनाखाली एकूण १३८०अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. २०३ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १००९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.