नाशिक – येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे अद्ययावत सुसज्ज १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तातडीने पुरविण्याच्या सुचना इमारतीचे विस्तारीकरण उद्घाटन प्रसंगी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप विभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृप्पास्वामी, वैशाली सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर यांच्यासह अधिकारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आज १०० खाटांच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होत असून तालुक्यातील नागरिकांना उत्तम प्रकारची आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. या चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी या अगोदरच एकूण ९७ नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, वैद्यकीय स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, बालरोगतज्ञ, एक अस्थिव्यंग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक, एक दंत चिकित्सक, एक वैद्यकीय अधिकारी अपघात, एक वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक अधिसेविका, पाच परिसेविका, एक प्रशासकीय अधिकारी, एक कार्यालयीन अधीक्षक तर २० अधिपरिचारिका यांच्यासह एक भौतिकोपचार तज्ञ,एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ, एक प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग,एक इसीजी तंत्रज्ञ, दोन औषध निर्माण अधिकारी, दोन प्रयोगशाळा सहाय्यक, एक भांडार तथा वस्त्रपाल, एक बाह्यरुग्ण सेवक, तीन अपघात विभाग सेवक, १ रक्तपेढी परिचर, दोन शस्त्रक्रिया परिचर, एक व्रणोपचारक, दोन बाह्यरुग्ण लिपिक, ६ कक्षसेवक, एक शिपाई, एक सफाईगार अशी पदे मंजूर करण्यात आली आहे.