येवला – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरात उभे राहत असलेल्या थोर स्वातंत्र सेनानी तात्या टोपे स्मारकाची आज अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तसेच या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक निसार शेख, मुश्ताक शेख, निसार निंबुवाले, गणेश शिंदे, गटनेता प्रवीण बनकर, अहेमद शेख, मुश्रीफ शहा, मलिक शेख, प्रमोद पाटील, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, प्रसाद पाटील, भरत कानडे, अविनाश कुक्कर, भाऊसाहेब धनवटे सचीन सोनवणे, विशाल परदेशी, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.येवला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीच्या परिसरात लगत स्वातंत्र सेनानी तात्या टोपे यांचे ८.७२ एकरात भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकासाठी १० कोटी ५० लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ७५ टक्के,राज्य शासनाचा १५ टक्के तर येवला नगरपालिकेचा १० टक्के वाटा असणार आहे.या स्मारकात माहिती केंद्र, संग्रहालय, सभागृह, वाचनालय, गार्डन, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, संगीत फवारे, लेझर शो, कॅन्टीन, ओपन अँम्पिथिएटर,पार्किंग, स्वच्छता गृह यांचा समावेश असून या स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे. या कामाची पाहणी करून स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.